spot_img

क्रिप्टो ट्रेडिंगच्या आमिषाने ७२ लाखांची ऑनलाईन फसवणूक; आंतरराष्ट्रीय सूत्रधार वर्षभरानंतर दिल्ली विमानतळावर अटक

क्रिप्टो ट्रेडिंगच्या

क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या मुख्य सूत्रधाराला सोलापूर शहर सायबर पोलिसांनी जवळपास एक वर्षानंतर अटक करण्यात यश मिळवले आहे. नेपाळमध्ये राहून चिनी आणि नेपाळी साथीदारांच्या मदतीने भारतात ऑनलाइन फसवणुकीचे जाळे चालवणाऱ्या या आरोपीला दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४/२०२५ अंतर्गत १६ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६ (C) आणि ६६ (D) अंतर्गत आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी व्यक्तीशी ऑनलाईन संपर्क साधून क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये १० ते ३०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मोठ्या परताव्याचे आश्वासन देत त्यांनी फिर्यादीकडून हळूहळू गुंतवणूक करून घेतली. या पद्धतीने आरोपींनी एकूण ७२ लाख ६४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात समोर आले.

तपासादरम्यान सोलापूर सायबर पोलिसांनी या प्रकरणात एकूण चार आरोपींची ओळख पटवली आहे. त्यामध्ये मुख्य सूत्रधार रोज मगर थापा (वय २३, बोसन, दक्षिणखली-१, काठमांडू, नेपाळ) याचा समावेश आहे. तसेच त्याचा सहकारी दोरजे तमांग याचाही तपासात उल्लेख आहे.

तपासात उघड झाले की, फसवणुकीतून मिळालेली काही रक्कम सारस्वत बँकेत असलेल्या ‘एम इंजिनिअरिंग’ नावाच्या चालू खात्यात जमा करण्यात आली होती. या खात्याचा वापर आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिस तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. आरोपी रोज मगर थापा हा नेपाळचा नागरिक असून नेपाळमध्ये संपर्कात आलेल्या काही चिनी नागरिकांच्या सांगण्यावरून तो भारतात येऊन फसवणुकीचे नेटवर्क चालवत होता. तो भारतातील काही लोकांना कमिशनचे आमिष दाखवत त्यांच्या नावाने बँक खाती उघडून घेत असे आणि त्यांचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करत होता.

या खात्यांमध्ये फसवणुकीची रक्कम जमा करून ती पुढे विविध खात्यांमध्ये वर्ग करण्यात येत असे. आरोपीने दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि मणिपूर या राज्यांमध्ये राहून हे जाळे चालवले असल्याचे तपासात उघड झाले आहे.

दरम्यान तपासादरम्यान आरोपीच्या पासपोर्टची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याविरुद्ध २०२५ मध्ये लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी परदेशात असल्याने सोलापूर सायबर पोलिसांनी इमिग्रेशन विभागाशी समन्वय साधून त्याचा मागोवा घेतला.

यानंतर ८ मार्च २०२६ रोजी आरोपी भारतात येत असताना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सायबर पोलिसांनी या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध सुरू केला असून त्यांच्यावरही अटकेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

सोलापूर शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर जास्त नफा मिळवून देण्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये. काही व्यक्ती कमिशन किंवा मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून बँक खाते, पासबुक, एटीएम कार्ड, सिमकार्ड किंवा ओटीपीसारखी माहिती मागतात.

अशा प्रकारची माहिती कोणालाही देऊ नये. अन्यथा त्या खात्यांचा वापर करून इतर राज्यांतील लोकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक होऊ शकते आणि नकळत संबंधित व्यक्तीही गुन्ह्यात आरोपी ठरू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

587FansLike
23,808FollowersFollow
4FollowersFollow
4,214SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_imgspot_img

Latest Articles