spot_img

येरमाळा यात्रेत मंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; 1.31 लाखांचे दागिने जप्त.

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी यात्रेत महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 लाख 31 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, यात्रेतील सुरक्षेबाबत पोलिसांच्या दक्षतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

येरमाळा येथील येडेश्वरी यात्रा ही राज्यभरातील भाविकांसाठी अत्यंत श्रद्धास्थान मानली जाते. दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. या गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांकडून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी केल्याच्या घटना समोर येत असतात. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष पथक तैनात करून यात्रेच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यात्रेतील गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त घालत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत आमराई परिसरातील मंदिराजवळ दोन महिला आणि एक पुरुष संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयितांवर नजर ठेवली.

काही वेळ निरीक्षण केल्यानंतर हे तिघे गर्दीचा फायदा घेत चोरीचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत येरमाळा पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. चौकशीत आरोपींनी आपली नावे अनिल शेषेराव शिंदे (वय 34), सुनिता अनिल शिंदे (वय 29) आणि हिराबाई रमेश शिंदे (वय 40, सर्व रा. इंदिरानगर पाथरी, जि. परभणी) अशी सांगितली.

पोलिसांनी केलेल्या अंगझडतीदरम्यान अनिल शिंदे याच्या खिशातून चार वेगवेगळे सोन्याचे मनी मंगळसूत्र आढळून आले. पुढील चौकशीत आरोपींनी यात्रेतील अंघोळीच्या ठिकाणी आणि गर्दीच्या भागात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे चोरण्याची कबुली दिली. त्यांनी याआधीही अशा प्रकारच्या चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे यात्रेत आलेल्या भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पोलिसांनी वेळेत कारवाई करत चोरट्यांचा बंदोबस्त केल्याने मोठा गुन्हा टळला आहे. तसेच, यात्रेत येणाऱ्या भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई यात्रेतील सुरक्षेसाठी महत्त्वाची मानली जात असून, पुढील काही दिवस पोलिसांकडून अशाच प्रकारच्या गस्त आणि तपास मोहिमा अधिक तीव्र केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

587FansLike
23,808FollowersFollow
4FollowersFollow
4,214SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_imgspot_img

Latest Articles