कोल्हापूर शहरातील विक्रमनगर परिसरात दारूच्या व्यसनामुळे संतापजनक घटना घडली असून, एका वडिलांनी स्वतःच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना 20 एप्रिल रोजी रात्री घडली असून, पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.
मृत तरुणाचे नाव जुनेद गफूर पठाण (वय 21) असे असून, तो दारूच्या व्यसनामुळे कुटुंबीयांना वारंवार त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी वडील गफूर सुलतान पठाण (वय 45) हे चिकन विक्रीचा व्यवसाय करत असून, कुटुंब विक्रमनगरमधील स्वामी समर्थ कॉलनी परिसरात राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवजयंतीच्या मिरवणुकीदरम्यान जुनेद दारूच्या नशेत नाचत असल्याची माहिती वडिलांना मिळाली. यामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी त्याला जबरदस्तीने घरी आणले. यानंतर दारू पिण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर जुनेदने वडिलांना मारहाण केल्याचेही समोर आले आहे.
या घटनेनंतर संतापाच्या भरात गफूर पठाण यांनी घरातील धारदार चाकू उचलून मुलाच्या शरीरावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या जुनेदला तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर कुटुंबीयांनी सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मिरवणुकीतील ट्रॉलीचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मृत्यू संशयास्पद वाटल्याने शवविच्छेदनाचा निर्णय घेण्यात आला. तपासादरम्यान सत्य बाहेर आले आणि पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. जुनेद हा अनेकदा दारूच्या नशेत घरी येऊन आई-वडील, आजी आणि भावंडांना शिवीगाळ व मारहाण करत असे. तसेच तो वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्याही देत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा दारूच्या व्यसनामुळे कुटुंबांमध्ये वाढणाऱ्या तणावाचे आणि त्यातून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचे वास्तव समोर आले आहे.






