गोंदिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र चोरीचा प्रकार समोर आला आहे. मामाच्या घरात राहण्यासाठी आलेल्या भाचीनेच घरातील सुमारे 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने आरोपीने काही दागिने थेट घरातील शौचालयात फेकून दिले, तर काही तलावात लपवून ठेवले होते.
ही घटना आमगाव तालुक्यातील शिवनी गावात घडली असून पोलिसांनी तपास करत अखेर या प्रकरणाचा उलगडा केला आहे. तक्रारदार संगीता पाथोडे (वय 39) यांनी पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नणंदेच्या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपले सोन्याचे दागिने त्यांच्या घरी ठेवले होते. हे दागिने त्यांनी बेडरूममधील लाकडी पेटीत ठेवले होते.
दरम्यान, 14 मार्च रोजी आरोपी भाची भाग्यश्री मेंढे ही वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी संगीता यांच्या घरी आली होती. त्या दिवशी संगीता यांनी तिला दागिने दाखवले. त्यानंतर संधी साधून भाग्यश्रीने हे सर्व दागिने चोरून आपल्या बॅगेत टाकले आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गावी निघून गेली.
घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली आणि अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या चोरीमध्ये तीन हार, तीन जोड कानातले, तीन अंगठ्या, एक जोड पायल आणि तीन जोड नथ असा एकूण सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.
पोलिसांनी तपासादरम्यान संशयित भाचीची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान तिने सांगितले की, पोलिसांच्या भीतीने काही दागिने घरातील शौचालयात फेकले तर काही कामठा येथील तलावात लपवून ठेवले.
यानंतर पोलिसांनी शौचालयातून तसेच तलावातून शोधमोहीम राबवून सर्व दागिने जप्त केले. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे नातेसंबंधांतील विश्वासाला मोठा धक्का बसला असून, घरातील व्यक्तींनीच अशा प्रकारे चोरी केल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.






