spot_img

हिंगोलीत बनावट रेल्वे पोलिस टोळीचा पर्दाफाश; 3 आरोपी अटकेत, एक फरार

हिंगोली जिल्ह्यात बनावट रेल्वे पोलिस बनून नागरिकांची आणि पोलिसांचीच फसवणूक करणाऱ्या टोळीचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात मध्यप्रदेशातील तिघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने सायबर सेलच्या मदतीने ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी स्वतःला रेल्वे पोलीस अधिकारी म्हणून ओळख करून देत होती आणि बनावट अपघाताच्या कहाण्या सांगून नागरिकांना भावनिकरित्या जाळ्यात अडकवत होती. “खंडवा रेल्वे स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार” अशी खोटी ओळख सांगून आरोपी फोन करत होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे सांगून मृतदेह पाठवण्यासाठी किंवा आइस बॉक्स खरेदीसाठी पैसे मागितले जात होते.

या टोळीने केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे, तर पोलिस अधिकाऱ्यांनाही लक्ष्य केले होते. कळमनुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रेमप्रकाश माकोडे यांना अशाच प्रकारचा फोन आला होता. आरोपींनी कळमनुरीतील एका मुलीचा खंडवा येथे अपघातात मृत्यू झाल्याची खोटी माहिती देत 5 हजार रुपयांची मागणी केली. विश्वास ठेवून माकोडे यांनी पैसे पाठवले.

याच पद्धतीने वसमत ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनाही फोन करण्यात आला होता. मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी घटनेची खातरजमा केली. तपासात खंडवा येथे असा कोणताही अपघात घडलेला नसल्याचे स्पष्ट झाले आणि फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

यानंतर हिंगोली पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तपासाची दिशा बदलली. मोबाईल नंबर आणि कॉल डिटेल्सच्या आधारे या टोळीचे धागेदोरे मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यापर्यंत पोहोचले. हिंगोली पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने छापा टाकत अमित कुर्मी, वीरसिंग गौंड आणि भारत कुर्मी या तिघांना अटक केली. या प्रकरणातील सीताराम कुर्मी हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

प्राथमिक तपासात या टोळीने देशभरात अशाच प्रकारे अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. बनावट ओळख, भावनिक दबाव आणि तातडीची परिस्थिती निर्माण करून पैसे उकळण्याची ही त्यांची पद्धत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या घटनेनंतर हिंगोली पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणताही फोन कॉल किंवा संदेश आल्यास त्याची खातरजमा केल्याशिवाय पैसे पाठवू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः पोलिस किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे मागितले जात असल्यास अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

587FansLike
23,808FollowersFollow
4FollowersFollow
4,214SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_imgspot_img

Latest Articles