जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात ज्वारी खरेदीसाठी टोकन मिळवण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत 3 ते 4 शेतकरी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी भडगावमधील शेतकरी संघाच्या कार्यालयासमोर मोठ्या संख्येने शेतकरी जमले होते. ज्वारी खरेदीसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत ऑनलाईन नोंदणीसाठी टोकन घेण्यासाठी ही गर्दी झाली होती. अनेक शेतकरी रात्रीपासूनच रांगेत उभे होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही मूलभूत सुविधा पुरवण्यात आली नव्हती. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, तसेच उन्हापासून बचावासाठी सावलीचीही सोय नव्हती.
भर उन्हात लांबच लांब रांगा लागल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. शेतकऱ्यांची संख्या वाढत गेल्याने गर्दी नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केल्याचे सांगितले जात आहे.
या लाठीचार्जमध्ये काही शेतकरी जखमी झाले. त्यापैकी काहींना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तत्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेवरून शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष व्यक्त केला जात आहे. जखमी शेतकरी संजय शांताराम पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “आम्ही आमच्या पिकाच्या विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी आलो होतो, कोणताही गोंधळ घालण्यासाठी नाही. योग्य नियोजन न करता पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शेतकरी पाटील यांची मुलगी राधिका पाटील हिनेही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “माझे वडील रात्रीपासून उपाशीपोटी रांगेत उभे होते. त्यांना इतका मार बसला की भडगाव ते जळगावपर्यंत रक्त थांबत नव्हते. पोलिसांचे काम संरक्षणाचे आहे, मारहाणीचे नाही,” असे म्हणत त्यांनी प्रशासनावर टीका केली. तसेच, या प्रकरणी कायदेशीर लढा देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या संपूर्ण घटनेमुळे शेतकरी वर्गात असंतोष वाढला असून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन आणि सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.






