मुंबईतील प्रतिष्ठित Taj Palace Hotel येथे फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष Alexander Stubb यांचे विशेष स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ ‘सुस्वागतम्’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचे दर्शन घडवणारे विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये ‘जोगवा’ या सादरीकरणाने विशेष लक्ष वेधले. या कार्यक्रमात महादुर्गा, महाकाली आणि महा सरस्वती या देवींचे प्रतीकात्मक दर्शन घडवण्यात आले.
याशिवाय महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नमन’ या लोकनाट्यपरंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण पात्रांचेही सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील श्रद्धा, परंपरा आणि कलात्मकता यांचे दर्शन घडले.
कार्यक्रमातील आणखी एक आकर्षण म्हणजे ‘पंढरीची वारी’ या सांस्कृतिक सादरीकरणाचा समावेश. वारकरी परंपरेचे महत्त्व, भक्तीभाव आणि संत परंपरेचा वारसा या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडण्यात आला. वारीची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग मानली जाते.
या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकपरंपरा, अध्यात्मिक वारसा आणि कलासंपन्नता यांचे दर्शन फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांना घडवण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे कौतुक केले.
महाराष्ट्राच्या विविध लोककलांचा आणि सांस्कृतिक वारशाचा असा भव्य परिचय देत फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे मुंबईत विशेष स्वागत करण्यात आले.






