नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांची मंत्रालयातील कार्यालयात भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
या बैठकीदरम्यान नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली. विशेषतः रेणापूर सुधा प्रकल्प, पिंपळढव साठवण तलाव आणि उर्ध्व पेनगंगा प्रकल्प यांसारख्या सिंचन योजनांना गती देण्याची आणि त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच महाराष्ट्र सुधारणा कार्यक्रमांतर्गत डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प आणि सुधा बृहद लघु पाटबंधारे प्रकल्प यांना निधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.
याशिवाय अर्धापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जागेवर ‘नमो उद्यान’ विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच मुदखेड येथील जलसंपदा विभागाची जमीन न्यायालय, न्यायाधीशांचे निवासस्थान आणि ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी हस्तांतरित करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळाली.






