कोल्हापूर : राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. विश्वासू समजून घरात कामावर ठेवलेल्या मोलकरणीनेच डॉक्टरांच्या घरातून आणि हॉस्पिटलमधून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाकाळा परिसरातील डॉ. रमेश निगडे यांच्या ‘श्रीराम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ आणि त्यांच्या निवासस्थानी ही चोरी घडली. स्नेहा रमेश निगडे (वय 64, रा. राजारामपुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसांनी शबाना अरब (वय 38, रा. राजेंद्रनगर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला गेल्या दीड ते दोन वर्षांपासून निगडे कुटुंबीयांकडे सफाई कामगार म्हणून कार्यरत होती.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जून 2025 ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत आरोपी महिलेने अत्यंत शिताफीने घर आणि हॉस्पिटलमधील मौल्यवान वस्तू हळूहळू चोरून नेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरांच्या खिशातून दोन हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर निगडे कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी अधिक चौकशी सुरू केली.

चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. आरोपी महिलेने घरातील सुमारे 13 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले असून त्यामध्ये 12 अंगठ्या, तीन सोन्याच्या साखळ्या, दोन मंगळसूत्र, कानातील टॉप्स तसेच लहान मुलांचे ब्रेसलेट यांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे दोन किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू—ज्यात ताटे, वाट्या, ग्लास, चमचे, पूजेचे साहित्य आणि देवांच्या प्रतिमांची नाणी यांचा समावेश आहे—तिने चोरल्याचे उघड झाले आहे. तसेच रोख रक्कमही लंपास करण्यात आली आहे. एकूण चोरीचा मुद्देमाल तब्बल 22 लाख 88 हजार रुपयांचा असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राजारामपुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित महिलेला ताब्यात घेतले असून तिची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिस निरीक्षक सतीश होडगर आणि उपनिरीक्षक रूपेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, राजारामपुरी परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. चार दिवसांपूर्वीच प्रतिभानगर भागातही अशाच प्रकारे मोलकरणीने सात तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी नागरिकांना घरकामगार किंवा सफाई कामगार नेमताना त्यांची पूर्ण चौकशी करण्याचे, ओळखपत्र तपासण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे ‘विश्वास’ या नात्यालाच धक्का बसल्याची भावना अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.