बुलढाणा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या एका तरुणीचा प्री-वेडिंग शूटनंतर आजारपणामुळे मृत्यू झाला. तिचा विवाह ३ मे रोजी होणार होता, मात्र त्याआधीच नियतीने तिच्यावर घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी भावी वधू-वराने निसर्गरम्य ठिकाणी प्री-वेडिंग शूट केले होते. शूटनंतर घरी परतल्यावर तरुणीची प्रकृती अचानक बिघडली. सुरुवातीला स्थानिक स्तरावर उपचार करण्यात आले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला वाशीम, अकोला आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. अखेरीस २३ एप्रिल रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
तिच्या मृत्यूमागे नेमके कारण स्पष्ट नसले तरी वाढत्या तापमानाचा परिणाम, एसी गाडीतून बाहेर पडून उन्हात शूट करणे यामुळे उष्माघात (हीट स्ट्रोक) झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, लग्नाच्या आनंदाऐवजी शोककळा पसरली आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.